Thursday, 4 August 2011

तरुणाईच्या मनातलं


तरुणाईच्या मनातलं


चंचल अल्लड मातीत
बीज उद्याचं रुजलेलं
अस्तित्वाच्या मायेत
अवलंबाने भिजलेलं
रंग त्याचे गं पाहुनी
लगी लाजली ती अवनी
      मला म्हणालं
      काल समजलं
सांगतो थोडा कळलेलं
तरुणाईच्या मनातलं 1


अनुभवाने उभ राहिलं
झाड आपुल्या पायांवर
थंडी वारा सोशियले 
पाउस घेत अंगावर
मन त्याचं हरवलेलं
भूतकाळात सापडलं
     मला म्हणालं
     काल उमगलं
लगबग लगबग उलगडलं
तरुणाईच्या मनातलं 2


बाल असो वा वृद्ध असो 
कुमार असो वा तरुण दिसो
तारुण्य मनी स्फुरलेलं
प्रत्येकामध्ये लपलेलं
तारुण्याचा फुलात बंध
निर्माल्याला आणि गंध
       कवी सांगतो
      ह्या कवितेतुनी
मनात तुमच्या दडलेलं
तरुणाईच्या मनातलं  3

प्रणव कानिटकर
                                 

Monday, 1 August 2011

सखी


सखी

डोळे मिटले, सखी तरिहि, पापण्यातुनी, फडफडते  
माझ्या हृदयी, श्वास म्हणूनी, क्षणाक्षणाला, धडधडते ||धृ||

तिच्या स्वरांनी, सकाळ होते, सायंकाळी, तिच्या स्मृती
विरह सखीचा, इतुका हट्टी, धरणी देखील, कळवळते 1

सखी चांदणे मुखी चंद्रमा मजला सुखवी या राती
प्रेम सखीचे इतुके लाघव काळजामध्ये लुकलुकते 2

पौर्णिमेचा चंद्र लाजरा मुखी घेउनी निजते ती
आस सखीची विषासारखी रक्तामधुनी भिनाभिनते 3

पुन्हा  बापड्या देहावरती आठवणीचा पडे सडा
नयनी माझ्या तिची बाहुली सावलीपरी वणवणते 4

कडे कपाऱ्या झाडे बोलती नद्या संगती तिच्या कथा
भोवऱ्यापरि सखी सारखी मनाभोवती भिरभिरते 5

रात्र वाटते मज चुकलेली  जेंव्हा सरते तिच्याविना
उगी छेडती तिचीच स्वप्ने झोप शेवटी हळहळते 6

मन माझे भावूकवेडे तिच्याविना गं तळमळते
सारे सारे क्षुद्र मानुनी तिच्याभोवती घुटमळते 7

केंव्हा तिजला कळेल सगळे मजला ठाऊक नाही ते
तोवर माझे असले जिणे मला काय ते परवडते 8

प्रणव कानिटकर

Friday, 29 July 2011

उजेड


उजेड

लाटांवरती, लाटा जाती, किती जाहल्या, कुणा कळे
दु;खावरती, सुखे जळाली, असे भोगणे, कुणा टळे

किती आपुले, अंतर आहे, गगनालाही, प्रश्न पडे
आम्हा जवळी, नसतानाही,अंतर देणे, सदा घडे

शब्दालाही, किंमत होती, ‘अर्थालाही’, अर्थ खरा
शब्द विकावा, ‘अर्थासाठी’, इतुका स्वार्थ, नव्हे बरा

भूतकाळाच्या, पानांवरती’, खाडाखोडी, ना जमते
‘पाने’ पुसली, संस्कारांची, तोंड रंगले, बघ थुकते

त्यास बोलणे, ना जमते रे, तरी ना अडते, जरी ‘मुका’
चार सुखांना, मुकला तरीही, तोही घेऊ शके मुका’

भविष्याच्या, उंबरठ्यावर, उजेड पडतो, कष्टाचा
आजकालचे, खोटे जगणे, उजेड दावील, उद्याचा

 प्रणव कानिटकर