सखी
डोळे मिटले, सखी तरिहि, पापण्यातुनी, फडफडते
माझ्या हृदयी, श्वास म्हणूनी, क्षणाक्षणाला, धडधडते ||धृ||
तिच्या स्वरांनी, सकाळ होते, सायंकाळी, तिच्या स्मृती
विरह सखीचा, इतुका हट्टी, धरणी देखील, कळवळते 1
सखी चांदणे मुखी चंद्रमा मजला सुखवी या राती
प्रेम सखीचे इतुके लाघव काळजामध्ये लुकलुकते 2
पौर्णिमेचा चंद्र लाजरा मुखी घेउनी निजते ती
आस सखीची विषासारखी रक्तामधुनी भिनाभिनते 3
पुन्हा बापड्या देहावरती आठवणीचा पडे सडा
नयनी माझ्या तिची बाहुली सावलीपरी वणवणते 4
कडे कपाऱ्या झाडे बोलती नद्या संगती तिच्या कथा
भोवऱ्यापरि सखी सारखी मनाभोवती भिरभिरते 5
रात्र वाटते मज चुकलेली जेंव्हा सरते तिच्याविना
उगी छेडती तिचीच स्वप्ने झोप शेवटी हळहळते 6
मन माझे भावूकवेडे तिच्याविना गं तळमळते
सारे सारे क्षुद्र मानुनी तिच्याभोवती घुटमळते 7
केंव्हा तिजला कळेल सगळे मजला ठाऊक नाही ते
तोवर माझे असले जिणे मला काय ते परवडते 8
प्रणव कानिटकर
Subhan allah .... khupach god aheSubhan allah .... khupach god ahe
ReplyDelete