Friday, 29 July 2011

उजेड


उजेड

लाटांवरती, लाटा जाती, किती जाहल्या, कुणा कळे
दु;खावरती, सुखे जळाली, असे भोगणे, कुणा टळे

किती आपुले, अंतर आहे, गगनालाही, प्रश्न पडे
आम्हा जवळी, नसतानाही,अंतर देणे, सदा घडे

शब्दालाही, किंमत होती, ‘अर्थालाही’, अर्थ खरा
शब्द विकावा, ‘अर्थासाठी’, इतुका स्वार्थ, नव्हे बरा

भूतकाळाच्या, पानांवरती’, खाडाखोडी, ना जमते
‘पाने’ पुसली, संस्कारांची, तोंड रंगले, बघ थुकते

त्यास बोलणे, ना जमते रे, तरी ना अडते, जरी ‘मुका’
चार सुखांना, मुकला तरीही, तोही घेऊ शके मुका’

भविष्याच्या, उंबरठ्यावर, उजेड पडतो, कष्टाचा
आजकालचे, खोटे जगणे, उजेड दावील, उद्याचा

 प्रणव कानिटकर 



Monday, 25 July 2011

गंध


गंध


मेघ गर्जले, वीज पेटली, पाऊस बरसत आला
पुन्हा एकदा, भिजली माती, गंध नवा मोहरला

सळसळ सळसळ, उधळीत सुमने, सुसाट वारा आला
पानोपानी, दारोदारी, गंध पसरला गेला

दूर नभाच्या, झाडावरती, भ्रमरसखा बसलेला
पानफुलांच्या, लावाजम्यांचा, गंध हुंगला गेला

बंध रेशमी, तारुण्याचे, मनात उमटत गेले
गंध गुलाबी, वात्सल्याचे, क्षणात उमजत गेले

परती मागे, कैक परतल्या, संकोचांच्या लाटा
रेशीम नाती, जुळून आली, स्मरल्या गंधित वाटा

आताशा त्या, गंधालाही, मनात केले बद्ध
आठवणीतच, गंध राहावा, असे म्हणे प्रारब्ध

 प्रणव कानिटकर 

नंदादीप


नंदादीप

अंबराच्या कुपीतुनी अर्थ मेघी ओथंबला
इंद्रधनुच्या साथीने नंदादीप उजळला

ममतेच्या कुशीतुनी वात्सलेच्या स्पर्शातूनी
मातृत्वाच्या भावातुनी नंदादीप जन्मियला

मूर्ती मनाने लाघवी वृत्ती नावाला गाजवी
त्या तुझ्या नेत्रपल्लवी नंदादीप ओझरला

पाकळीच्या ओंजळीने ओटी धरेची थाटली
गोजिऱ्या सुवासिनीने नंदादीप ओवाळला

प्रांजल्या पानांवरती दवबिंदू विस्तावले
अस्तराच्या लाखीतुनी नंदादीप चकाकला

 प्रणव कानिटकर 

रे घना


रे घना

होते क्षणिक स्फटिक, निरभ्र आकाश
जैसे उरावे तरावे, ह्या घनांचे पाश
काय काय घेशील रे, हावऱ्या गगना
दाटली गाठली माया, सृजना रे घना

बघ आस धरलेला, अस्वस्थसा मोर
तुला पाहण्या नाह्ण्या, केंव्हाचा आतुर
कर तृप्त आज राती, फक्त त्याच्या मना
दाटली गाठली माया, सृजना रे घना

तुझे बळ किती थोर, निर्मायाची वीज
ती जाता येता होणाऱ्या, टक्कारीचे चीज
तुझ्यामुळे मिळे घना, पाणी माझ्या तना
दाटली गाठली माया, सृजना रे घना

तू असला थोर तरी, नभाचे  कौतुक
असे वागणे लोका, जमे आपसूक
समजे मला अन्यायाची, अघोरी यातना
दाटली गाठली माया, सृजना रे घना

जशा कोसळती गात्री, अमृताच्या धारा
सोबत असावी सखी, अन अंगी शहारा
उगीच करे ती प्रिया, दाह भावनांना
दाटली गाठली माया, सृजना रे घना

 प्रणव कानिटकर