चंद्राशी करार
आभाळाच्या घोड्यांवर, मन झाले जेंव्हा स्वार
चांदण्यांच्या रस्त्यावर, केला चंद्राशी करार
तिच्या माझ्या आभाळात, नको कुठला चांदोबा
प्रेमप्रज्ञ धरेलाही नको, सूर्य नावी बाबा
हरवलेल्या जीवनी सदा, सर्वदा अंधार
तीच माझ्यासाठी ज्योती, मी पहाटेचा गंधार
आम्हा दोघा मिलापांचा, काही वेगळा थरार
चांदण्यांच्या रस्त्यावर, केला चंद्राशी करार
तिच्या माझ्या वाटांवर, धुंद गंधांची कवाडे
मनाच्या सुमानांवर, किती प्रेमाचे कोनाडे
वाट चालता आनंद, त्यात जरासा आक्रंद
ती जीवनाचा स्वानंद, मी कोवळा मकरंद
श्वास उमजल्या कळीला, उरे देठाचा आधार
चांदण्यांच्या रस्त्यावर, केला चंद्राशी करार
तिच्या माझ्या नात्यामध्ये, ना बंधनाचे किनारे
तिच्या शिवाय जागी या, ना वाहती स्वैर वारे
ती म्हणजे कुणीही असो, प्रिया असो वा प्रतिभा
तिच्या माझ्या आभाळात, नको कुठला चांदोबा
काल परवा परवा, पक्का केला विचार
चांदण्यांच्या रस्त्यावर, केला चंद्राशी करार
चांदण्यांच्या रस्त्यावर, केला चंद्राशी करार
प्रणव कानिटकर
No comments:
Post a Comment